श्री तुकाराम महाराज हरिपाठ

श्री तुकाराम महाराज हरिपाठ १ नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥ गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥३॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥४॥ २ पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ॥१॥ केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ॥२॥ माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥३॥ नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥४॥ तुका म्हणे एका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ॥५॥ ३ अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ॥१॥ मोक्ष पुर्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥२॥ नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ॥३॥ तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ॥४॥ ४ यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥१॥ नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ॥२॥ जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ॥३॥ तुका म्हणे ...